आरोग्यदायी लाह्या
« Reply #1 on: September 20, 2020, 04:08:02 PM »
[आरोग्यदायी लाह्या:
तांदुळाच्या लाह्या आरोग्याला हितकर व पावसाळा आणि सुरू होणाऱ्या शरद ऋतूत पथ्यकर आहेत. नागपंचमीला दूध- लाह्यांचा नैवेद्य, गणेश चतुर्थीला गणपतीला लाह्या वाहणे, पंचखाद्य मध्ये लाह्या घालणे इत्यादी गोष्टी पावसाळ्यात व शरद ऋतूत लाह्वया घ्र्याव्यात असे सांगत असतात. वर्षभर पचण्यास हलके म्हणून खाण्याच्या गोष्टींमध्ये लाह्या पथ्यकर आहेत.
लाह्या पचण्यास हलक्‍या, भूक व पचनशक्ती वाढवणार्‍या, कफ कमी करणाऱ्या व पित्तशामक आहेत. लाह्या घेतल्याने उलटी, मळमळ कमी होते व शौचास बांधून येण्यास मदत होते. त्यामुळे उलटी व जुलाब होत असताना लाह्या घेणे हितकर आहे. जास्त तहान लागत असेल तर लाह्यांचे पाणी प्यावे.  उलटी, जुलाब झाले असताना लाह्यांचे पाणी घेतले तर पचन सुधारते, शक्ती टिकून राहते, व dehydration होत नाही. उलटी होत असताना कोरड्या लाह्या खाणे अधिक उपयोगी आहे.
चरबी वाढून वजन वाढले असेल तर नाश्ता व मधल्या वेळेत अन्य काही खाण्या ऐवजी लाह्यांचा चिवडा किंवा नुसत्या लाह्या भाजून घ्याव्यात. लाह्या प्रमेहाचा रोग्याला सुद्धा घेता येतात. कफामुळे खोकला येत असेल तर मुगाचे कढण व लाह्या घ्याव्यात.
लाह्यांचा चिवडा:
* तुसं काढून लाह्या स्वच्छ करून घ्याव्यात.
*  एका कढईत तूप, जिरे याची फोडणी करावी, किंवा तेल व जिऱ्याची फोडणी करावी. त्यात  कढीपत्ता व हळद घालून लाह्या परतून घ्याव्यात. थोडे मीठ व गार होत असताना थोडी पिठीसाखर घालावी. चुरमुऱ्याचे भडंग करतात त्याच पद्धतीने करावे. पित्ताची उलटी किंवा  पोटात जळजळ होत असेल तर तूप वापरावे.
पावसाळा व शरद ऋतूत मधल्या वेळेत खायला किंवा कमी भूक असेल तेव्हा,  लंघन सोसत नसेल तर लाह्या खाल्ल्याने आरोग्य चांगले होते व शक्ती टिकून राहते.
हल्ली तांदुळांच्या लाह्यांप्रमाणेच गहू, ज्वारी यांच्या सुद्धा लाह्या उपलब्ध असतात. त्याही खाण्यास हरकत नाही. अर्थात त्यांचे गुण तांदुळांच्या लाह्यांपेक्षा थोडे वेगळे असतात.
चला तर, बिस्किटे, वेफर्स, कुरकुरे असे खाण्याऐवजी मधल्या वेळेत लाह्या खाऊ या व मुलांना पण देऊ या.
--- वैद्य माधवीलता दीक्षित
« Last Edit: September 20, 2020, 04:11:54 PM by vaidyaupendra »